Bhandara ST Depo Accident : नियतीचा खेळ अत्यंत क्रूर असतो, याचाच प्रत्यय भंडारा एसटी डेपोमध्ये आलेल्या एका भीषण अपघातातून आला. डेपोमध्ये पिण्याच्या पाण्याची कॅन आणण्यासाठी गेलेल्या पित्यावर आणि त्यांच्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्यावर एसटी बसने काळाची झडप घातली. रिव्हर्स घेताना बसने दुचाकीला चिरडल्याने रोहित खेडकर आणि त्यांच्या लहानग्या मुलाचा जागीच अंत झाला.
नेमकी घटना काय?
शहरातील चांदणी चौक परिसरातील रहिवासी असलेले रोहित खेडकर (३०) यांचा ‘आरो प्लांट’चा व्यवसाय होता. शुक्रवारी (२४ एप्रिल) रात्री ८ वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे डेपोतील रिकाम्या पाण्याच्या कॅन आणण्यासाठी गेले होते. नेहमी एकटेच जाणारे रोहित यावेळी आनंदाने आपला ३ वर्षांचा मुलगा रौनक यालाही सोबत घेऊन गेले होते. मात्र, हा आनंद काही क्षणांचाच ठरला.
असा घडला अपघात…
दुरुस्ती शेडमध्ये उभी असलेली एसटी बस (MH 40 Y 5876) चालक रिव्हर्स घेत असताना रोहित आपल्या दुचाकीसह बसच्या मागेच उभे होते. चालकाला अंदाज न आल्याने बसने दुचाकीला जोराची धडक दिली आणि काही अंतर फरफटत नेले. या भीषण धडकेत बाप-लेक बसच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नागरिकांचा उद्रेक आणि रात्रभर ठिय्या
या घटनेची माहिती मिळताच भंडारा शहरात संतापाची लाट उसळली. शेकडो नागरिकांनी आणि मृतकाच्या नातेवाईकांनी एसटी डेपोमध्ये धाव घेत प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळावी आणि घरातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी, या मागणीसाठी खासदार प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिल्हाभरातील पोलीस ताफा डेपोत तैनात करण्यात आला होता.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन
रात्रभर चाललेला हा तणाव शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होता. अखेर एसटी महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी नरमाईची भूमिका घेतली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आले.


