नवी दिल्ली : एलॉन मस्कच्या एक्स (X) या कंपनीने XChat नावाचे एक नवीन स्वतंत्र मेसेजिंग ॲप लाँच केले आहे. सध्या, हे ॲप आयओएस (iOS) युजर्ससाठी उपलब्ध आहे. या ॲपद्वारे, युजर्स त्यांच्या एक्स कॉन्टॅक्ट्ससोबत चॅट, कॉल आणि फाईल्स शेअर करू शकतील. या लाँचवरून असे दिसून येते की, मस्कची ‘ऑल-इन-वन’ ॲप तयार करण्याची रणनीती आता थोड्या वेगळ्या दिशेने जात आहे.
एक्सचॅट युजर्सना ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग, टेक्स्ट मेसेजिंग, ग्रुप चॅट आणि फाइल शेअरिंग यांसारखी अनेक प्रगत फीचर्स देत आहे. शिवाय, गोपनीयतेचा विचार करून, यात मेसेज आपोआप नाहीसे होणे (Disappearing Messages), सर्वांसाठी मेसेज एडिट आणि डिलीट करण्याचा पर्याय, आणि स्क्रीनशॉट ब्लॉक करणे यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या ॲपमध्ये कोणतेही ट्रॅकिंग किंवा जाहिरात नाही. याव्यतिरिक्त, यात एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणि पिन सुरक्षा आहे. ही फीचईस पाहता, हे एक्सचॅट व्हॉट्सॲप आणि फेसबुक मेसेंजरशी थेट टक्कर देण्याची तयारी करत आहे.
सध्या, एक्सचॅट (XChat) फक्त iOS युजर्ससाठी उपलब्ध आहे, परंतु भविष्यात ते इतर प्लॅटफॉर्मवरही लॉन्च होऊ शकते. बेंजी टेलरने संकेत दिले आहेत की, लवकरच ॲपमध्ये आणखी अपडेट्स जोडले जातील.


