Pune Crime : पुण्यातील नामांकित आयएलएस लॉ कॉलेजमध्ये रँगिंगचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील पाच जणांनी मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पीडित विद्यार्थ्याने त्रास सहन न झाल्याने पोलिसांत धाव घेतली. हा प्रकार हॉस्टेल परिसरात घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्याने कॉलेज प्रशासनाकडे तक्रार करूनही योग्य कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, मागच्या आठवड्यातच एका विद्यार्थ्याकडून बेकायदेशीर आणि अपारदर्शक पद्धतीने वसूल केलेले एक लाखांहून अधिकचे शुल्क सहा टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
कॉलेजने मागील वर्षात ‘इतर शुल्क’ या नावाखाली कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठी रक्कम वसूल केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते.


