Pawar Family Meet: महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यातील संघर्ष सर्वश्रुत असतानाच, पुण्यातून एक मोठी कौटुंबिक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या पुण्यातील ‘मोदीबाग’ या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबाला स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे. गेल्या काही दिवसांतील राजकीय तणाव आणि शरद पवार यांची प्रकृती या पार्श्वभूमीवर या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच पंगतीला?
या स्नेहभोजनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शरद पवारांनी केवळ जवळच्या नातेवाईकांनाच नव्हे, तर राजकीय प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या कुटुंबातील सदस्यांनाही बोलावले आहे. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचा समावेश आहे. याशिवाय पार्थ पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार आणि कुटुंबातील इतर सदस्य, जे राजकारणात सक्रिय नाहीत, त्यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
भेटीचे नेमके कारण काय?
जरी या भेटीभोवती राजकीय चर्चांचे वलय असले, तरी त्यामागे काही कौटुंबिक कारणे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचे लग्न ठरले असून, त्या आनंदाच्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येत असल्याची चर्चा आहे. नुकतेच शरद पवार रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतले आहेत. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी सर्वांशी संवाद साधण्यासाठी हे आयोजन केल्याचे समजते. राजकारण बाजूला ठेवून पवार कुटुंबातील वैयक्तिक नाते जपण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे पवारांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
उपस्थितीबाबत उत्सुकता
आज संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास हे स्नेहभोजन रंगणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. जय पवार सध्या पुण्याच्या बाहेर असल्याने ते या भेटीला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या शरद पवार पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत, त्यापूर्वी आजच्या या घरगुती मुक्कामात होणाऱ्या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ‘मोदीबाग’मध्ये आज केवळ जेवणाचा आस्वाद घेतला जाईल की काही राजकीय खलबते शिजतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


