Pune Crime : पुणे शहरातील चंदननगर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला असून, प्रियकराने घरात घुसून तरुणीवर चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. दुसऱ्यासोबत लग्न ठरल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उजालादेवी दोहरे असे जखमी तरुणीचे नाव आहे. आरोपी दिलीप राठोड याने तिच्या घरात घुसून गळ्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार २९ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८ वाजता घडला. आरोपी आणि पीडित तरुणी हे दोघेही पुण्यातील एका नामांकित मॉलमध्ये एकत्र काम करत होते. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंधात झाले होते. दरम्यान, तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले.
ही बाब समजताच आरोपी संतप्त झाला. २९ एप्रिल रोजी त्याने तिच्या घरी जाऊन हल्ला केला आणि त्यानंतर फरार झाला. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.


