Sunetra Pawar : बीड जिल्ह्यात आज महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी सुनेत्रा पवार पहिल्यांदाच दौऱ्यावर येत असून, हा दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दिवंगत अजित पवार यांनी बीडकरांसाठी पाहिलेल्या विकासस्वप्नांची पूर्तता करण्याची मोठी जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आहे.
अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, बीड जिल्ह्यातही त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यांच्या जाण्यानंतर विकासकामांचा वेग मंदावला असला, तरी सुनेत्रा पवार यांनी पालकमंत्री म्हणून सूत्रे हाती घेत जिल्ह्याच्या विकासाला नव्याने चालना देण्याचा विश्वास दिला आहे.
बीडमध्ये वाढती गुन्हेगारी, वाळुमाफिया, दुष्काळ आणि पाणीटंचाईसारखे गंभीर प्रश्न अजूनही कायम आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनावर वचक ठेवत, प्रलंबित प्रकल्पांना गती देणे आणि शेतकरी प्रश्न सोडवणे, ही मोठी जबाबदारी त्यांच्यासमोर असणार आहे.
याशिवाय, संघटनात्मक पातळीवरही राष्ट्रवादी काँग्रेसची घडी विस्कटल्याचे चित्र दिसत आहे. पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव, बैठकींचा अभाव आणि गटबाजी यामुळे पक्ष कमकुवत होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्ष संघटन पुन्हा मजबूत करण्याचे आव्हानही सुनेत्रा पवार यांच्यासमोर उभे आहे.
अजित पवारांच्या कार्यपद्धतीप्रमाणे कडक प्रशासन, प्रामाणिक अधिकाऱ्यांना पाठबळ आणि गैरप्रकारांवर कारवाई, हा पॅटर्न कायम ठेवत सुनेत्रा पवार बीडमध्ये काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या पहिल्या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


