Maharashtra Weather : राज्यात पुढील काही दिवस उष्णतेचा तडाखा कायम राहणार असून मे महिना अधिक तापदायक ठरण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, मेच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात दिलासा मिळेल, मात्र दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात पुन्हा वाढ होणार आहे.
विशेषतः विदर्भ आणि कोकणातील काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच किमान तापमानातही वाढ होणार असल्याने रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवणार आहे.
महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज असून, विदर्भात उष्णतेची लाटसदृश्य परिस्थिती कायम राहू शकते. त्यामुळे नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उकाड्यात थोडा दिलासा मिळू शकतो.
यंदा मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या स्वरूपावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात उष्णतेसह अनियमित हवामानाचा सामना करावा लागू शकतो.


