Gondia Crime News: शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे उघडकीस आली आहे. आपल्याच घरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका सेवानिवृत्त प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, घटनेला ६ दिवस उलटूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
नेमकी घटना काय?
पीडित मुलगी ही आरोपी सेवानिवृत्त प्राचार्य काशिनाथ शहारे यांच्या घरात भाड्याने चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहात राहते. २८ एप्रिल रोजी आरोपीने “माझ्या पत्नीच्या साडीला इस्त्री (प्रेस) करून दे,” असे सांगून मुलीला आपल्या खोलीत बोलावले. तक्रारीनुसार, मुलीला खोलीत नेल्यानंतर आरोपीने तिचा हात पकडून पैशांचे आमिष दाखवले आणि तिच्या मनाविरुद्ध गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांची भूमिका आणि ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा
या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने देवरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी काशिनाथ शहारे याच्याविरुद्ध ‘पोक्सो’ (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह
एका अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार घडून ६ दिवस झाले तरी आरोपी मोकाट असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी माहिती दिली की, “आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील.”
सामाजिक अध:पतन
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या शिक्षक आणि प्राचार्याकडूनच असे कृत्य घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


