Maharashtra Weather : राज्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असतानाच हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने ३ ते ५ मेदरम्यान राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाचा इशारा दिला असून काही जिल्ह्यांना सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २ मे रोजी कोकण-गोवा भागात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात उष्णतेचा तडाखा काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आकाश निरभ्र राहणार असून उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळी ढगाळ वातावरण राहू शकते, तर दुपारनंतर आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे.
दरम्यान, ३ मेपासून विदर्भासह राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काढणीस आलेल्या पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः भंडारा जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तुमसर तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी भातपीक जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामानाची परिस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.


