Mumbai-Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे मोठ्या उत्साहात लोकार्पण झाल्यानंतरही पुण्यावरून मुंबईकडे जाणारी मार्गिका अद्याप बंद असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या लेनवरील काही कामे बाकी असल्याने ती पुढील दोन ते तीन दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे.
लोणावळा घाट परिसरातील खोपोली एक्झिट ते कुसगावदरम्यान उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. लोकार्पणानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका सुरू करण्यात आली असून त्या मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे.
मात्र पुण्यावरून मुंबईकडे जाणारी लेन अद्याप बंद असल्याने वाहनचालकांना जुन्या घाटमार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे काही प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, पुणे-मुंबई दिशेच्या मार्गिकेवरील काही तांत्रिक आणि अंतिम कामे अद्याप पूर्ण व्हायची आहेत. ही कामे पूर्ण होताच पुढील दोन ते तीन दिवसांत ही लेन सुरू केली जाईल.
दरम्यान, उद्घाटनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र आज सकाळपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक सुरळीत सुरू असून घाट परिसरात कोणतीही मोठी कोंडी नसल्याचे चित्र आहे.


