HSC Result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वीचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला असून यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारत आपले वर्चस्व कायम राखले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मुलींचा निकाल ९३.१५ टक्के लागला असून मुलांचा निकाल ८६.८० टक्के आहे. त्यामुळे मुलींनी यंदाही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विभागनिहाय निकालात कोकण विभागाने सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. पुणे आणि मुंबईसह राज्यातील अनेक विभागांचा निकाल समाधानकारक लागल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
निकालासंदर्भात माहिती देताना राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची सविस्तर माहिती दिली.


