Vaijnath Temple : परळी नगरपरिषदेनं शहरात दर सोमवारी मांसविक्री बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे परळी ही असा निर्णय घेणारी राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या वैद्यनाथ देवस्थानात दर सोमवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन शहरात सोमवारी मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, परळी नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.


