Solapur Crime : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून जिवलग मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याने वैराग परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश उर्फ अप्पासाहेब कापसे असे मृत तरुणाचे नाव असून बबलू मुळे असे आरोपीचे नाव आहे. दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र होते. मात्र, काही दिवसांपासून किरकोळ कारणांवरून त्यांच्यात वाद सुरू होता.
‘पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास का पाठवले?’ या मुद्द्यावरून दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात आरोपी बबलू मुळे याने दिनेश कापसे याच्यावर दगडाने हल्ला केला.
डोक्यावर गंभीर मार लागल्याने दिनेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणी मृताच्या भावाने वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


