Pune Crime : नसरापूर येथील चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. तपासादरम्यान आरोपीची लहान मुलींवर वाईट नजर असल्याचेही उघड झाले असून तो विकृत प्रवृत्तीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या संतापजनक घटनेनंतर परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. पीडित चिमुकलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पोलिसांच्या समजुतीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि रात्री उशिरा पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत चिमुरडीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) नेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दोषींना कठोर शिक्षा मिळावी, पीडित कुटुंबाला तातडीने मदत मिळावी तसेच प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात व्हावी, यासाठी आयोगाकडून पाठपुरावा केला जात आहे.
चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज भोर आणि राजगड तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. व्यापारी, दुकानदार आणि स्थानिक नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. हवेली, भोर आणि वेल्हा परिसरातील विविध संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवत निषेध नोंदवला आहे.
भोरमधील बंदला व्यापारी व स्थानिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण कायम आहे. आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून जोर धरत आहे.


