Deputy Tehsildar Suicide : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मौदा येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या४२ वर्षीय अधिकाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वैभव रामेश्वर राठोड असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव राठोड हे वानाडोंगरी येथील ग्रीन फिल्ड सोसायटीत वास्तव्यास होते. रविवारी त्यांची पत्नी आणि मुलगी गावी गेल्यानंतर ते घरी एकटेच होते. याचदरम्यान त्यांनी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केली.
संध्याकाळी त्यांच्या बहिणींनी घरी येऊन दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा आतून बंद असल्यामुळे संशय निर्माण झाला. त्यानंतर तातडीने एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, बेडरूममध्ये वैभव राठोड यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
ही घटना पाहून नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट किंवा संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
वैभव राठोड यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ते गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.


