Nasrapur Case : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील धक्कादायक प्रकरणात आता आणखी एक संतापजनक माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असताना, ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून आरोपीच्या क्रौर्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
पोलिसांना सादर करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालानुसार, आरोपीने चिमुकली आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या तोंडात पायमोजा कोंबल्याची माहिती समोर आली आहे. या खुलाशामुळे नागरिकांमध्ये संतापाची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
ससून रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे सुपूर्द केला असून, त्यातून काही महत्त्वाच्या बाबी उघड झाल्या आहेत. शवविच्छेदनावेळी मुलीच्या तोंडात मोजा आढळल्याने या प्रकरणातील क्रौर्य अधिक अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी चिमुकलीच्या अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे अचूक कारण समोर येणार आहे.
या प्रकरणातील नव्या खुलाशानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.


