Mulshi Crime: माणुसकीला लाजवेल अशी एक घटना मुळशी तालुक्यातील एका गावात उघडकीस आली असून, आईस्क्रीम विकायला आलेल्या एका नराधमाने अल्पवयीन गतिमंद मुलीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास पिंटू शिवकुमार (मूळचा उत्तर प्रदेश, सध्या राहणार सूस) हा दुचाकीवरून गावात आईस्क्रीम विकण्यासाठी आला होता. त्यावेळी पीडित १४ वर्षीय मुलगी आपल्या लहान बहिणीसह त्याच्याकडे कुल्फी घेण्यासाठी गेली. यावेळी ग्राहकीच्या बहाण्याने आरोपीने या मुलीला आपल्याजवळ ओढले आणि तिचा विनयभंग केला.
पीडितेने दाखवले धाडस
आरोपीच्या या कृत्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली, मात्र तिने आरडाओरडा करत तिथून कशीबशी सुटका करून घेतली. तिने धावत घर गाठले आणि पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीची आपबिती ऐकताच पालकांनी वेळ न घालवता ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला.
ग्रामस्थांनी केला पाठलाग
स्वतःचे कृत्य अंगाशी येईल या भीतीने आरोपी पिंटू शिवकुमार याने दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्याला जागीच पकडले आणि पौड पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांची कारवाई
पौड पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत आरोपीवर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या नराधमाला कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी सध्या संपूर्ण मुळशी तालुक्यातून होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.


