Watermelon Deaths: पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले आहे. या प्रकरणाच्या तपासात आता एक मोठी अपडेट समोर आली असून, ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार न मिळणे हे या मृत्यूंमागचे मोठे कारण असल्याचे मानले जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, बाधितांना रुग्णालयात नेण्यास तब्बल साडेपाच तासांचा विलंब झाला, जो जीवघेणा ठरला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यावर कुटुंबातील सदस्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेतल्यावर त्यांना थोडा आराम मिळाला. मात्र, थोड्या वेळाने प्रकृती पुन्हा खालावली. अशा गंभीर परिस्थितीत तातडीने मोठ्या रुग्णालयात हलवणे गरजेचे असताना, कुटुंब घरीच थांबले. अखेर दुपारी पावणे बाराच्या सुमारास त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक काय सांगते?
शवविच्छेदन अहवालातील प्राथमिक निष्कर्षानुसार, हा प्रकार तीव्र स्वरूपाच्या विषबाधेचा (Acute Poisoning) आहे. मात्र, ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे अद्याप गूढच आहे. अन्नामध्ये ‘मॉर्फिन’ सारख्या अत्यंत विषारी घटकांचा समावेश असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कलिंगडामुळेच विषबाधा झाली का? याचा तपास ‘एफडीए’ (FDA) करत असून त्यांचा अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
पोलिसी कारवाई आणि तपास
जे.जे. मार्ग पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत डझनभर लोकांचे जबाब नोंदवले आहेत. ज्या डॉक्टरांनी सुरुवातीला उपचार केले, त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. सध्या आम्ही अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली आहे. व्हिसेरा आणि टॉक्सिकोलॉजी रिपोर्ट (विषशास्त्र अहवाल) प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. अहवालात काही निष्पन्न झाल्यास दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांनी म्हटलं आहे.


