Nashik Farmer Death: अस्मानी संकटापासून आपले पीक वाचवण्यासाठी केलेल्या धडपडीचा शेवट अत्यंत भीषण झाला आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील बिजोटे येथील बापू सखाराम जाधव (६०) या अल्पभूधारक शेतकऱ्याचा वादळी वाऱ्यामुळे अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी कांदा झाकण्यासाठी शेताकडे जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.
लग्नाची लगबग सोडून पीक वाचवण्याची चिंता
बापू जाधव हे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी नामपूरला गेले होते. मात्र, दुपारी अचानक निसर्गाचे रूप बदलले. सोसाट्याचा वारा सुटल्याने आणि आभाळ भरून आल्याने, शेतात उघड्यावर पडलेला कांदा भिजेल या भीतीने ते अस्वस्थ झाले. आनंदाचा सोहळा अर्धवट सोडून ते आपल्या ‘लुना’वरून तातडीने शेताच्या दिशेने निघाले. मात्र, हीच त्यांची शेवटची सफर ठरली.
वादळाचा जीवघेणा तडाखा
बिजोटे-आखतवाडे रस्त्यावरील शिवाजी महाराज महाविद्यालय परिसरात ते पोहोचले असता, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्याकडेच्या झाडाची एक अजस्त्र फांदी थेट त्यांच्या अंगावर कोसळली. झाड अंगावर पडल्याने जाधव जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले, तर त्यांची दुचाकी लांब फेकली गेली. आवाजाचा मागोवा घेत स्थानिक शेतकरी आणि सरपंच पोपट जाधव यांनी तातडीने त्यांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉ. स्वराज देशमुख यांनी त्यांना मृत घोषित केले.
कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
जाधव कुटुंब पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. काबाडकष्ट करून पिकवलेला कांदा पावसापासून वाचवण्याच्या प्रयत्नात घरातील कर्ता पुरुष गेल्याने बिजोटे परिसरात शोककळा पसरली आहे. सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जायखेडा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.


