SSC Results: दहावीचा निकाल म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते ९०-९५ टक्क्यांचे डोंगर सर करणारे गुणवंत. मात्र, यंदा नांदेड जिल्ह्यात एका अशा निकालाची चर्चा आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंधार तालुक्यातील श्रुती दिगंबर पाटील भानानगरे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयांत नेमके ३५ गुण मिळवून ‘काठावर पास’ होण्याचा अजब विक्रम केला आहे.
सहाही विषयात ‘३५ पैकी ३५’!
श्रुतीचा निकाल हा गणिताच्या आकड्यांपेक्षाही अधिक रंजक ठरला आहे. तिला सहाही मुख्य विषयांत १०० पैकी ३५ गुण मिळाले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या सर्व विषयांच्या रकान्यात ‘३५’ हाच आकडा झळकत आहे. तिच्या या ‘परफेक्ट’ ३५ टक्क्यांच्या निकालाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
शेतकरी कन्या अन् जिद्दीचा प्रवास
श्रुती ही बारूळ येथील शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. तिची परिस्थिती बेताची असून वडील दिगंबर पाटील शेती करतात. श्रुती केवळ अभ्यासच करत नाही, तर शाळेतून आल्यावर आई-वडिलांना शेतात राबून मदतही करते. घरची कामे आणि शेती सांभाळून तिने मिळवलेले हे यश अनेक पदवीधरांपेक्षाही मोठे मानले जात आहे, कारण तिच्यासाठी उत्तीर्ण होणे हेच एक मोठे आव्हान होते. “यश फक्त मोठ्या आकड्यांत नसते, तर ते मिळवलेल्या जिद्दीत असते,” हेच श्रुतीने आपल्या निकालातून दाखवून दिले आहे. ९० टक्क्यांच्या शर्यतीत श्रुतीच्या या ‘३५’ गुणांचे कौतुक कौशल्याने कमी आणि आपुलकीने जास्त केले जात आहे.


