Pune Crime News : पुण्यात ऑनलाइन डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून लुटणाऱ्या टोळीचा वारजे माळवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाची आरोपींसोबत एका गे डेटिंग आणि चॅट ॲपवर ओळख झाली होती. काही दिवस चॅटिंग करून आरोपींनी त्याचा विश्वास संपादन केला आणि भेटण्यासाठी वारजे माळवाडी परिसरात बोलावलं.
भेटीनंतर आरोपींनी अचानक त्याला धमकावत बेदम मारहाण केली. त्याचा मोबाईल हिसकावून ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले. तसेच गळ्यातील चांदीची साखळीही लुटून आरोपी पसार झाले.
घाबरलेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपीसह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पकडलं. या टोळीने आणखी किती जणांना गंडा घातला आहे, याचा तपास सुरू आहे.


