Women Commission : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून या पदावर ‘आयात’ महिला नेत्याची नियुक्ती होण्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडवत आहे. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे.
महायुतीच्या सत्तावाटपात महिला आयोगाचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलं आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, डॉ. ज्योती मेटे, मीरा बोरवणकर आणि वैशाली मोठे यांची नावे चर्चेत होती. मात्र आता अचानक शायना एनसी यांचं नाव पुढे आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेनेत असलेल्या शायना एनसी यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, पक्षातील निष्ठावंत महिला नेत्यांमध्ये यामुळे अस्वस्थता वाढली असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार आहेत.


