Prateek Yadav Death: उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी त्यांचे अचानक जाणे सर्वांनाच चकित करून गेले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास त्यांना लखनऊ येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये आणण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
प्रतीक यादव यांची तब्येत बुधवारी अचानक खालावली होती, असे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रतीक यादव यांच्या पश्चात पत्नी अपर्णा यादव आणि दोन मुली असा परिवार आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा त्यांच्या पत्नी आणि उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष अपर्णा यादव या लखनऊमध्ये नव्हत्या. निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, नेत्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
राजकारणापासून दूर, व्यवसायात होते सक्रिय
देशातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्यांपैकी एक असलेल्या यादव कुटुंबाचे सदस्य असूनही प्रतीक यादव नेहमीच राजकारणापासून लांब राहिले. त्यांनी ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स येथून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले होते. प्रतीक हे एक यशस्वी उद्योजक होते; त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता आणि लखनऊमध्ये ते ‘फिटनेस प्लॅनेट’ नावाच्या जिमचे मालक होते. व्यवसायाव्यतिरिक्त, ते ‘जीव आश्रय’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय होते.
मैत्री, प्रेम आणि शाही विवाह
प्रतीक आणि अपर्णा यादव यांचा विवाह ४ डिसेंबर २०११ रोजी मुलायम सिंह यादव यांचे मूळ गाव सैफई येथे अत्यंत शाही थाटात पार पडला होता. या दोघांची मैत्री शालेय जीवनापासून होती, जिचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. सुमारे १० वर्षांच्या मैत्रीनंतर त्यांनी लग्नगाठ बांधली होती. हे जोडपे लखनऊमधील विक्रमादित्य मार्ग येथील निवासस्थानी वास्तव्यास होते. त्यांच्या अशा अकाली निधनाने यादव कुटुंबावर आणि समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


