Ravi Landge Foreign Tour: देशात आर्थिक काटकसर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या परदेश दौऱ्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अवघ्या काही तासांतच राज्य सरकारने या दौऱ्याला अधिकृत मान्यता दिली आहे, ज्यामुळे भाजपच्या अंतर्गत धोरणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमका काय आहे दौरा?
संयुक्त राष्ट्रांच्या ‘UN-Habitat’ संस्थेमार्फत अझरबैजानमधील बाकू येथे ‘वर्ल्ड अर्बन फोरम’चे १३ वे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. १७ ते २२ मे या कालावधीत होणाऱ्या या जागतिक परिषदेत शहरी विकासावर चर्चा होणार आहे. या परिषदेसाठी महापौर रवी लांडगे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अभय चौगुले जाणार असून, यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून ८ लाख ८० हजार २८१ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आवाहनाला हरताळ की तांत्रिक गरज?
१० मे रोजी पंतप्रधानांनी परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले होते, मात्र ११ मे रोजी राज्य सरकारने या दौऱ्याला हिरवा कंदिल दाखवला. केंद्र, राज्य आणि पिंपरी महानगरपालिका अशा तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता असताना हा विरोधाभास चव्हाट्यावर आला आहे.
महापौर रवी लांडगे यांची भूमिका:
या वादावर बोलताना महापौर लांडगे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “हा दौरा केवळ पर्यटनासाठी नसून शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जागतिक अधिवेशनासाठी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना परदेश दौरे रद्द करण्याचे जे आदेश दिले आहेत, त्याचा मी अभ्यास करत आहे. जर मुख्यमंत्र्यांचे हे आदेश अभ्यास दौऱ्यांसाठीही लागू असतील, तर मी माझा दौरा रद्द करण्यास तयार आहे.”
शहरवासीयांचे लक्ष निर्णयाकडे
एकिकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांच्या दौऱ्यांना कात्री लावली असताना, पिंपरीचे प्रथम नागरिक ‘देश प्रथम’ मानून आपला दौरा रद्द करतात की अझरबैजानला जाण्यावर ठाम राहतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. १७ मे पूर्वी यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.


