Devendra Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनोख्या शैलीत प्रतिसाद दिला आहे. आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस चक्क ‘रॉयल एनफिल्ड ३५०’ या दुचाकीवरून विधानभवनात दाखल झाले आणि सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. त्यांच्यासोबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि सुरक्षा ताफाही दुचाकीवरच होता. या कृतीतून मुख्यमंत्र्यांनी इंधन आणि परकीय चलन बचतीचा ठोस संदेश दिला आहे.
प्रशासकीय खर्चात मोठी कपात: मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
विधानभवनाच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या खर्चात कपात करण्यासाठी काही धाडसी निर्णय जाहीर केले:
- सरकारी कार्यक्रमांवर बंदी: आगामी सहा महिने राज्य सरकारमार्फत कोणत्याही भव्य किंवा मोठ्या शासकीय सोहळ्यांचे आयोजन केले जाणार नाही.
- विदेश दौरे रद्द: मंत्र्यांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अनावश्यक परदेश दौरे तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत.
- ताफ्यात घट: सुरक्षेसाठी वापरला जाणारा गाड्यांचा मोठा ताफा कमी करून साधेपणावर भर दिला जाणार आहे.
- अपवाद: साताऱ्याचा नियोजित कार्यक्रम आधीच ठरलेला असल्याने आणि त्यावर खर्च झाला असल्याने तो पार पडेल, मात्र त्यानंतर नवीन मोठ्या खर्चांना चाप बसणार आहे.
विरोधकांना प्रगल्भतेचा डोस
पंतप्रधानांच्या भूमिकेवर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी चांगलेच सुनावले. “जगातील इतर देशांनी अत्यंत कठोर निर्णय घेतले असताना, आपल्या पंतप्रधानांनी केवळ थोडा त्याग करण्याचे आवाहन केले आहे. यावर गदारोळ करणे म्हणजे राजकीय अपरिपक्वता आहे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. तसेच, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही यापूर्वी असे निर्णय घेतल्याची आठवण त्यांनी करून दिली.


