Solapur Accident : सोलापूर-पुणे महामार्गावर दुपारी एक अत्यंत थरकाप उडवणारी अपघाताची घटना घडली आहे. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुण्याहून निघालेल्या एका कुटुंबावर कोंडी गावाजवळ काळाने झडप घातली. भरधाव कारने ट्रकला पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत दोन महिला आणि एका दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
एकाच दुर्घटनेत विखुरले हसतेखेळते कुटुंब
या भीषण अपघातात जीव गमावलेल्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
- सिंधू रवी खंडागळे (वय 42 वर्षे)
- नंदा भाऊराव हाताळकर (वय 45 वर्षे – सिंधू खंडागळे यांच्या बहीण)
- रुद्राक्ष मोरे (वय दीड वर्ष)
हे सर्वजण पुणे जिल्ह्यातील देहूरोड परिसरातील रहिवासी आहेत. खंडागळे कुटुंब आपल्या नातेवाईकांसह कारने स्वामी दर्शनासाठी जात असताना हा घात झाला. अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
धावत्या ट्रकला मागून धडक; आई-वडील गंभीर जखमी
प्राथमिक माहितीनुसार, सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडी परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समोरील धावत्या ट्रकला पाठीमागून प्रचंड वेगाने धडकली. या दुर्घटनेत मृत चिमुकल्या रुद्राक्षचे वडील उमेश प्रकाश मोरे (वय 32) आणि आई साक्षी मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाची सोलापूरच्या सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
काळजाचा तुकडा गमावलेल्या माता-पित्याचा आक्रोश
आनंदाने देवाच्या दर्शनाला निघालेल्या या कुटुंबावर एका क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला. रुग्णालयात उपचार घेत असलेले जखमी आई-वडील आपल्या दीड वर्षाच्या रुद्राक्षला पाहण्यासाठी वारंवार हट्ट धरत होते. आपला पोटचा गोळा आता या जगात नाही, या कल्पनेनेच ते अस्वस्थ झाले होते. उमेश यांच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. रुग्णालयातील हे हृदयद्रावक दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे काळीज पिळवटून निघाले.


