Nagpur Accident : नागपूर जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. विटांनी भरलेला आयशर ट्रक उलटल्याने हा भीषण अपघात घडला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्याखाली जाऊन पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खापा येथून मोवाडकडे विटांनी भरलेला ट्रक रवाना झाला होता. नसावनेर मार्गावरील ईसापूर गावाजवळ पहाटे हा अपघात झाला. रात्रभर काम केल्यानंतर सहा मजूर ट्रकच्या केबिनमध्ये झोपलेले होते. याचवेळी भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याखाली जाऊन उलटला.
या भीषण अपघातात संजय कनेरे, लीलाधर वालूलकर आणि अजित भलावी यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजेंद्र राजगुरू, हेमराज कन्हेरे आणि सुभाष धुर्वे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर चालक आणि ट्रक मालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी मजुरांना मदतीशिवाय सोडून चालकाने पळ काढल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणी प्रवीण उर्फ गोलू बले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून काटोल पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्यान्वये गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.


