Mumbai Vadapav Price Hike: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र चटके आता थेट सामान्य मुंबईकरांच्या रोजच्या जगण्याला आणि त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थाला बसू लागले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे देशात पेट्रोल, डिझेल आणि कच्च्या तेलाच्या दरांचा भडका उडाला असून महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पगारवाढ नसताना वाढत्या खर्चाने नागरिक आधीच हैराण झाले आहेत. त्यातच आता या आंतरराष्ट्रीय वादाच्या महागाईच्या आगीत मुंबईकरांची ‘लाईफलाईन’ समजला जाणारा वडापावही चांगलाच होरपळला आहे.
वडापावच्या किमतीत 5 ते 7 रुपयांची वाढ
धावपळीच्या मुंबईत चालता-बोलता भूक भागवणारे हक्काचे साधन म्हणजे वडापाव होय. मात्र, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर, खाद्यतेल आणि पावाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि वडापाव विक्रेत्यांना दरवाढ करणे भाग पडले आहे. या नव्या दरवाढीमुळे मुंबईकरांना आता एका वडापावसाठी थेट 20 ते 35 रुपये मोजावे लागणार आहेत. वडापावच्या मूळ किमतीत सुमारे 5 ते 7 रुपयांची वाढ होत असल्याने रोज वडापाव खाणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
मुंबईच्या विविध भागांतील दरांचे नवे गणित
मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत वडापावचे दर आधीच भिन्न आहेत, परंतु आता या नव्या महागाईमुळे त्यात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. दादर आणि परिसरात जिथे आधी 20 ते 25 रुपयांत वडापाव मिळायचा, तिथे आता ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. इतर उपनगरांमध्येही कच्चा माल महागल्याने छोट्या गाड्यांपासून ते मोठ्या हॉटेल्सपर्यंत वडापावचे दर आता 25 ते 35 रुपयांच्या घरात पोहोचले आहेत.
जागतिक युद्धाचा भारताला विळखा आणि हाहाकाराची भीती
गेल्या अवघ्या 10 दिवसांत तब्बल 3 वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये तर इंधनाचा साठा संपल्याने तीव्र तुटवडा आणि ऊर्जेचे संकट निर्माण झाले आहे. केंद्र सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, जर इराण-अमेरिका युद्ध पुढील काही दिवस असेच सुरू राहिले, तर भारतात केवळ खाद्यपदार्थच नव्हे, तर संपूर्ण बाजारपेठेत हाहाकार उडू शकतो, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.


