Ahilya Nagar: अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जमाव पांगवण्याच्या प्रात्यक्षिकादरम्यान (Mock Drill) एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. प्रशिक्षण सुरू असताना अचानक एका स्मोक हँडग्रेनेडचा जवानाच्या हातातच स्फोट झाला. या भीषण अपघातात चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, स्फोटाच्या तीव्रतेमुळे दोन जवानांच्या हाताची बोटे छिन्नविच्छिन्न झाली आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रात्यक्षिकादरम्यान उडाला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुख्यालयाच्या मैदानावर नेहमीप्रमाणे प्रशिक्षण वर्ग सुरू होते. वरिष्ठ अधिकारी जवानांना हँडग्रेनेड हाताळण्याचे तंत्र प्रात्यक्षिकासह समजावून सांगत होते. ही माहिती घेत असतानाच एका जवानाच्या हातात असलेल्या ग्रेनेडचा अचानक स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून उर्वरित दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की संपूर्ण पोलीस मुख्यालय परिसर हादरून गेला. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने मैदानाकडे धाव घेतली. सर्व जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
अपघात नेमका कसा झाला?
या संपूर्ण प्रकरणावर राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “हा अपघात जमाव पांगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘स्मोक हँडग्रेनेड’मुळे (धूर सोडणारा ग्रेनेड) झाला. प्रशिक्षण सुरू असताना या ग्रेनेडची सुरक्षा पिन (Safety Pin) काढल्यानंतर, संबंधित जवानाकडून चुकून त्याचे लिव्हर सुटले. परिणामी, तो खाली फेकण्यापूर्वीच त्याचा हातात स्फोट झाला.” या दुर्दैवी अपघातामुळे पोलीस प्रशासनासह सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.


