Ebola Virus: आफ्रिकन देशांमध्ये ‘इबोला’ (Ebola) या अत्यंत घातक विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवी जीवनाला असलेल्या या गंभीर धोक्याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरात ‘आरोग्य आणीबाणी’ जाहीर केली आहे. या आंतरराष्ट्रीय इशाऱ्यानंतर भारत सरकार तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले असून, नागरी विमानन महासंचालनालयाने (DGCA) देशातील सर्व विमानतळांसाठी नवीन नियमावली (SOPs) जारी केली आहे. त्यानुसार, कोव्हिड-१९ च्या धर्तीवर विमान प्रवासासाठी अत्यंत कडक नियम लागू करण्यात आले आहेत.
२० हून अधिक विमान कंपन्यांना रेड अलर्ट; ‘स्व-घोषणा पत्र’ बंधनकारक
युगांडा आणि काँगो या इबोला प्रभावित आफ्रिकन देशांमधून थेट किंवा कनेक्टिंग विमानाने भारतात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष पाळत ठेवली जाणार आहे. एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर, एमिरेट्स, एअर फ्रान्स आणि एतिहाद यांसारख्या २० हून अधिक आघाडीच्या विमान कंपन्यांना DGCA ने खालील सक्तीचे आदेश दिले आहेत:
- प्रवाशांची माहिती अनिवार्य: प्रभावित देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना भारतात उतरण्यापूर्वी ‘स्व-घोषणा पत्र’ (Self-Declaration Form) भरणे सक्तीचे असेल.
- आरोग्य मंत्रालयाकडे सुपूर्द: विमान कंपन्यांना ही सर्व पत्रे गोळा करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे तातडीने जमा करावी लागणार आहेत.
विमानात मास्क, PPE किट सक्तीचे; संशयित रुग्णांसाठी ‘बॅक सीट आयसोलेशन’
प्रवासादरम्यान संसर्ग रोखण्यासाठी विमानातील अंतर्गत सुरक्षेबाबत अत्यंत कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत:
- आणीबाणीच्या किट्स: विमानातील फर्स्ट-एड बॉक्समध्ये आता ३-लेअर मास्क, डिस्पोजेबल हातमोजे, पीपीई (PPE) किट आणि सॅनिटायझर असणे अनिवार्य आहे.
- लक्षणे दिसल्यास तात्काळ कळवा: प्रवाशांना ताप, तीव्र अशक्तपणा, स्नायूदुखी, उलट्या, जुलाब, अंगावर पुरळ किंवा अंतर्गत रक्तस्राव अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरित क्रू मेंबर्सना माहिती देणे गरजेचे आहे.
- विमानातच आयसोलेशन: अशी लक्षणे असणाऱ्या संशयित रुग्णाला विमानातील सर्वात शेवटच्या रांगेत आयसोलेट केले जाईल आणि सुरक्षेचा उपाय म्हणून त्याच्या आजूबाजूच्या जागा रिकाम्या ठेवल्या जातील.


