Sanjay Raut On NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांवरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी वाढत असल्याच्या चर्चांदरम्यान आता संजय राऊत यांनी मोठं विधान करत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पक्षात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीला हे वाद केवळ प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यापुरते मर्यादित असल्याचे बोलले जात होते. पक्षातील काही निर्णयप्रक्रिया आणि वागणुकीबद्दल नाराजी असल्याने या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचीही चर्चा होती. आता या मतभेदांचे पडसाद इतर वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.
विशेषतः एका ठेकेदाराला काम देण्याच्या मुद्यावरून छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी पक्षातील सध्याच्या वातावरणाबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. पूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना अशा प्रकारच्या घटना घडत नव्हत्या, असे मत त्यांनी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
याच मुद्द्यावर भाष्य करत संजय राऊत यांनी अजित पवारांच्या गटावर जोरदार टीका केली. त्यांनी दावा केला की, अजित पवारांनी उभा केलेला पक्ष भविष्यात टिकणार नाही. तसेच पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना आता घेतलेल्या राजकीय निर्णयांचा पश्चाताप होत असावा, असेही त्यांनी म्हटले. राऊत यांनी छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत, भाजपसोबत जाण्याचा निर्णय योग्य होता का याचा विचार आता हे नेते करत असतील, असा टोला लगावला.
राज्यात सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींवर आमची भूमिका केवळ निरीक्षकाची असल्याचे सांगत, “जे घडत आहे ते पाहत राहणे आणि परिस्थितीला तिच्या मार्गाने जाऊ देणे, हेच आमचे सध्याचे राजकीय काम आहे,” अशी मिश्कील प्रतिक्रिया देखील राऊत यांनी दिली.


