Weather Update : महाराष्ट्रातील उष्णतेचा कडाका काहीसा कमी झाला असला तरी राज्यात पुढील काही दिवस मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी वादळी पाऊस व तुरळक गारपिटीचा इशारा देत येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय राज्यातील इतर अनेक भागांमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाली असली तरी वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे उकाड्याचा त्रास कायम आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका जाणवत असून काही भागांत ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार होत आहेत.
दरम्यान, देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेल्या नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण तमिळनाडू, लक्षद्वीप परिसर, अरबी समुद्राचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही क्षेत्रांमध्ये मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
यंदा मान्सूनने अंदमान-निकोबार बेटांमध्ये वेळेआधी प्रवेश करून चांगली सुरुवात केली होती. मात्र वातावरणातील बदलांमुळे केरळमधील आगमनाला काहीसा विलंब झाला. आता पुढील दोन दिवसांत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता वाढली असून त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या सुरू असलेला पाऊस हा मान्सूनपूर्व स्वरूपाचा असून शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाई न करता मान्सूनच्या अधिकृत आगमनाची प्रतीक्षा करावी.


