Bribery Case : मुंबईतील वांद्रे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आरटीओमधील वरिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, तक्रारदाराच्या मालकीच्या बसवर वांद्रे आरटीओकडून 26 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. हा दंड कमी करून देण्यासाठी वरिष्ठ लिपिक मिथुन विलास आडे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. यासाठी त्यांनी 5 हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले.
लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने आरोपीला 4 हजार रुपयांची रक्कम दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करत मिथुन आडे यांना रंगेहात ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येतात का, याची चौकशी केली जात आहे.
सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना एसीबीने केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. या घटनेमुळे शासकीय यंत्रणांमधील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


