Balasaheb Thorat: विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आता महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह उघड झाला आहे. पुणे आणि नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मविआने घेतलेल्या माघारीमुळे राजकीय वातावरण तापले असून, आघाडीतील नेत्यांमध्येच आता जुंपल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्याचा खरपूस समाचार घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी, “मतांचे गणित जुळत नसेल तर कशाला निवडणूक लढवायची? अशी मानसिकता ठेवणारेही आमच्यात आहेत,” असा खोचक टोला लगावला आहे. थोरातांच्या या विधानामुळे उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयावरून मविआमध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घोडेबाजारामुळेच पुण्यातून माघार; सुप्रिया सुळेंचा थेट आरोप
पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी विधान परिषद निवडणुकीतील गैरप्रकारांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. “सध्याच्या विधान परिषद निवडणुकीत लोकशाहीचा कोणताही उत्साह जाणवत नाही. लोकसभा किंवा विधानसभेसारखी निकोप स्पर्धा येथे नसून केवळ पैशांचा आणि घोडेबाजाराचा खेळ सुरू आहे. हा वाढता भ्रष्टाचार आणि घोडेबाजार रोखणे अशक्य असल्याचे दिसल्यामुळेच महाविकास आघाडीने पुणे विधान परिषदेच्या जागेवरून माघार घेण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला,” असे सुळे यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
‘लढण्याआधीच हार मानणारेही आमच्यात’; थोरातांचे सुळेंना सडेतोड उत्तर
सुप्रिया सुळेंच्या या भूमिकेनंतर नाशिकमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मविआच्या रणनीतीवर बोलताना सुळेंच्या विधानाचा समाचार घेतला. आघाडीतील नाराजी फोल असल्याचे सांगत थोरात म्हणाले की, भाजपाने लोकशाही मूल्यांना हरताळ फासत, दबावाचे राजकारण करून अनेकांना माघार घेण्यास भाग पाडले आहे. मात्र, याच वेळी सुप्रिया सुळेंचे नाव न घेता ते म्हणाले, “मतांची बेरीज नसेल तर निवडणुकीच्या रिंगणात उतरायचेच कशाला, अशी हार मानणारी मंडळी सुद्धा आज आमच्या आघाडीत आहेत.” थोरातांच्या या थेट टिप्पणीमुळे मविआतील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.
नाशिकमधील माघारीवर थोरातांचे महायुतीला प्रत्युत्तर
नाशिकच्या जागेवरून मविआने माघार का घेतली, यावर स्पष्टीकरण देताना थोरात यांनी सांगितले की, नाशिकच्या जागेबाबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली असून, एका निश्चित रणनीती अंतर्गतच हा निर्णय घेण्यात आला आहे. याच वेळी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, “दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा महायुतीने स्वतःच्या घरात पाहावे. नाशिकमध्ये महायुतीचा प्रचंड गोंधळ उडाला असून, नक्की कोणाला पाठिंबा द्यायचा, हेच त्यांना अजून ठरवता आलेले नाही.”


