Jalgaon Accident : जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना समोर आली आहे. अमळनेर-धुळे महामार्गावरील मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास कार, एसटी बस आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या तिहेरी अपघातात तब्बल 6 जणांनी आपला जीव गमावला आहे. धुळ्याकडून अमळनेरच्या दिशेने अत्यंत वेगाने येणाऱ्या एका कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही कार समोरून येणाऱ्या एसटी बस आणि दुचाकीवर थेट जाऊन आदळली. हा अपघात इतका भयानक होता की दुचाकीचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आणि दुचाकीस्वारासह कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.
आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला; गुजरातच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
अपघाता बळी ठरलेले कारमधील प्रवासी हे गुजरात राज्यातील व्यारा येथील एकाच कुटुंबातील सदस्य होते. अमळनेर येथे आयोजित एका कौटुंबिक साखरपुड्याच्या समारंभासाठी हे सर्वजण आनंदाने निघाले होते; मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघातामुळे लग्नघरावर आणि परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
कारमध्ये अडकलेल्या चिमुरड्याला गावकऱ्यांनी दिले जीवनदान; जखमींवर उपचार सुरू
अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. कारच्या झालेल्या ढिगाऱ्यात एक लहान मुलगा अडकला होता. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि एसटी कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून त्या चिमुरड्याला सुखरूप बाहेर काढले. या दुर्घटनेत एसटी बसमधील एका प्रवाशासह अन्य काही जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला.


