Washim News : मालेगाव तालुक्यातील तिवळी गावात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडवली होती. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मृतक संतोष बकाल यांच्या सख्ख्या भावासह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३ जून रोजी संतोष बकाल यांचा मृतदेह महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याचवेळी पत्नी वर्षा उर्फ इंद्रायणी बकाल आणि दोन लहान मुलांचे मृतदेह गावातील विहिरीत आढळून आले होते. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण वाशिम जिल्हा हादरला होता.
दरम्यान, इंद्रायणी बकाल यांचे भाऊ सुधाकर इंगोले यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. शेती, जमिनीतील हिस्सा आणि आर्थिक व्यवहारांवरून संतोष बकाल यांना त्यांच्या नातेवाईकांकडून अनेक वर्षे मानसिक त्रास दिला जात होता. सततचा वाद, शिवीगाळ, अपमान आणि दबावामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीनंतर शिरपूर पोलिसांनी महादेव उर्फ महादा बकाल, उर्मिला बकाल, पंकज बकाल आणि भगवान उर्फ सावन बकाल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108 आणि 3(5) अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मुख्य आरोपी अटकेत
या प्रकरणातील मुख्य आरोपी महादेव बकाल याला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. चौघांच्या मृत्यूमागे नेमके काय कारण होते, कौटुंबिक वादाची भूमिका किती होती आणि या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


