Nagpur Crime: नागपूरमधील सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला सुरक्षेला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करणे, अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करणे आणि त्यानंतर मध्य प्रदेशात नेऊन तिचे बळजबरीने धर्मांतर करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कलमेश्वर येथील रहिवासी असलेल्या अयाज ताज मदारे आणि अमीन शेख या २ आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील तिसरा संशयित आरोपी असलेला मध्य प्रदेशच्या तामिया येथील हजरत मौलवी सध्या फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तामिया येथे रवाना झाले आहे.
प्लॉट खरेदीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये अत्याचार
पीडित महिलेचे पती भारतीय लष्करात (Army) कार्यरत असून ते सध्या दुसऱ्या शहरात कर्तव्यावर तैनात आहेत. दरम्यान, ही महिला नागपुरात प्रॉपर्टी डीलिंगचे काम करते. मुख्य आरोपी आणि पीडिता हे बालपणापासून एकमेकांना ओळखत होते आणि एकाच गावात शेजारी राहत होते. महिलेचा विवाह 2024 मध्ये झाला होता, ज्यानंतर ते दोघे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पुन्हा संपर्कात आले. महिला रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत असल्याचे माहीत असल्याने, मुख्य आरोपीने फेब्रूवारी 2025 मध्ये एक भूखंड (प्लॉट) खरेदी करायचा असल्याचे सांगून तिला नागपूरच्या एका हॉटेलमध्ये बैठकीसाठी बोलावले. तिथे तिला गुंगीचे औषध मिसळलेला ज्यूस पाजून, ती बेशुद्ध असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्याचे अश्लील फोटो व व्हिडिओही काढले गेले.
तामियामध्ये नेऊन बळजबरीने निकाह आणि गोमांस खाण्याची सक्ती
अश्लील व्हिडिओच्या जोरावर ब्लॅकमेल करत आरोपींनी पीडितेला मध्य प्रदेशातील छिंदवाडा जवळील ‘तामिया’ या गावी नेले. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिथे एका मौलवीच्या उपस्थितीत तिची इच्छा नसताना बळजबरीने ‘कलमा’ पठण करून तिचा ‘निकाह’ (विवाह) लावण्यात आला. या जबरदस्तीच्या विवाह विधीनंतर पीडितेला बळजबरीने गोमांस खाण्यास भाग पाडण्यात आले. जेव्हा तिने मांसाच्या वेगळ्या चवीबद्दल विचारले, तेव्हा मुख्य आरोपीने ते गोमांस असल्याची कबुली दिली.
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा; पोलिसांकडे व्हिडिओ सुपूर्द
सोनेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तासरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने 13 जून रोजी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली, ज्यानंतर पोलिसांनी तातडीने एफआयआर (FIR) नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलमांसोबतच ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’ अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने पोलिसांना एक व्हिडिओ पुरावा म्हणून सोपवला आहे, ज्यामध्ये मुख्य आरोपी तिच्यावर जादूटोण्यासारखे काहीतरी कृत्य करताना दिसत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पीडितेचा मोबाईल फोन आणि तो व्हिडिओ जप्त केला असून, या संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी आणि फरार मौलवीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात तळ ठोकून आहे.


