सोलापूर : मंगळवेढा येथील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आला असून, रोहिणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिचा पती निलेश विलास पाराध्ये याच्याविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
गेल्या २६ मे रोजी २५ वर्षीय रोहिणी पाराध्ये हिने ब्रह्मपुरी हद्दीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. सुरुवातीला या आत्महत्येचे कारण अस्पष्ट होते, मात्र आता पतीच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
रोहिणीचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, पती निलेश हा रोहिणीला वारंवार टोमणे मारणे, मारहाण करणे आणि गंभीर परिणामांच्या धमक्या देणे असे कृत्य करत होता. या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.
या तक्रारीच्या आधारे मंगळवेढा पोलिसांनी आरोपी निलेश पाराध्ये याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आता या घटनेमागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि रोहिणीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) तपासत आहेत.
पती निलेशने तिला आत्महत्येस प्रवृत्त केले का, या दिशेने आता पोलीस तपासाची चक्रे गतीने फिरवत आहेत. या घटनेमुळे सोशल मीडिया विश्वात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


