Beed Crime News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्या हत्येप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचे नाव समोर आल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, सौरभ सोनवणे यांच्यावर अद्याप थेट गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
विलास घुले यांच्या नातेवाईकांनी सुरुवातीपासूनच सौरभ सोनवणे यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. हल्लेखोरांनी मारहाण करताना सौरभ सोनवणे यांचे नाव घेतल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भातील काही व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून संतापाची लाट उसळली आहे.
मुख्य आरोपींना तातडीने अटक करावी आणि सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी विलास घुले यांचा मृतदेह थेट केज पोलीस ठाण्याच्या आवारात आणून आंदोलन छेडले. तब्बल नऊ तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी संबंधितांकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. पोलिसांनी तपासादरम्यान सौरभ सोनवणे यांचे नाव जबाबात नोंदवले असले तरी त्यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या कुटुंबाचा हत्येशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. सत्य समोर आणण्यासाठी निष्पक्ष तपास व्हावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, विलास घुले यांच्या हत्येचा मुद्दा राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला असून आमदार धनंजय मुंडे आणि नमिता मुंदडा यांनीही आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


