Maharashtra Legislative Council : विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी १ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता उपसभापतीपदाची निवडणूक होणार असल्याची घोषणा केली आहे. विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ सर्वाधिक असले तरी, महायुतीतील ठरलेल्या सूत्रानुसार उपसभापतीपद शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या वाट्याला जाणार आहे.
माजी उपसभापती नीलम गोऱ्हे या या पदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात असताना, यावेळी मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ‘धक्कातंत्र’ वापरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे उपसभापतीपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंद्रकांत रघुवंशी विरुद्ध कृपाल तुमाने?
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेत उपसभापतीपदासाठी चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे. चंद्रकांत रघुवंशी यांना उपसभापतीपद द्यावे, अशी मागणी उत्तर महाराष्ट्रातील नऊ आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या आमदारांमध्ये अमोल पाटील, गोकुळ गिते, सत्यजित तांबे, आमशा पाडवी, किशोर पाटील, चंद्रकांत सोनावणे, चंद्रकांत पाटील, मंजुळा गावीत आणि तुळशीराम गावीत यांचा समावेश आहे. मात्र, यापूर्वीच्या राजकीय निर्णयांचा अनुभव पाहता, एकनाथ शिंदे अंतिम क्षणी वेगळाच निर्णय घेऊ शकतात, अशीही चर्चा सुरू आहे.
नीलम गोऱ्हेंच्या नावाचीही चर्चा कायम
माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्या शिवसेना शिंदे गटाकडून बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनाच उपसभापतीपदाची संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
तथापि, पक्षांतर्गत चर्चांमध्ये कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी आणि मनीषा कायंदे यांचीही नावे चर्चेत असल्याने अंतिम निर्णयापर्यंत उत्सुकता कायम राहणार आहे.
१ जुलैला चित्र स्पष्ट होणार
दरम्यान, विधान परिषदेत महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे ते उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज, छाननी, माघार आणि आवश्यक असल्यास मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून, १ जुलैलाच उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


