पुणे: २५ एप्रिलच्या रात्री दीड वाजता एका पेशंटचा मृत्यू होतो. नातेवाईक हॉस्पिटलला म्हणतात, बिल द्या आम्ही लगेच भरतो. आम्हाला मृतदेह (डेडबॉडी) ताब्यात द्या. मात्र, पूना हॉस्पिटल प्रशासनाने आता बिल करणारा माणूस नाही. त्यामुळे तुम्ही सकाळी साडेआठ वाजता या. मग तुम्हाला मृतदेह दिला जाईल, असे सांगत तब्बल आठ तासांनंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला. विशेष बाब म्हणजे या रुग्णावर शहरी गरीब योजनेतून मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे पूना हॉस्पिटलकडून रुग्णाला सात हजार रुपयांचा परतावा (रिफंड) मिळणार असल्याचे समोर आले आहे. जर बिल भरावेच लागणार नव्हते, तर मग आठ तास पूना हॉस्पिटलने मृतदेह का दिला नाही, असा प्रश्न आता पुणेकर विचारु लागले आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशाअभावी एका गरोदर महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुणे शहरांतील पूना हॉस्पिटलने यातून काहाही धडा घेतलाच नसल्याचे समोर आले आहे. पूना हॉस्पिटल प्रशासनाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जी संवेदनशिलता दाखवायला हवी होती. मात्र, ती संवेदनशिलता न दाखवता मनमानी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पूना हॉस्पिटलविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून मृत रुग्णाचे मेव्हणे नीलेश महाजन यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागात तक्रार दाखल करत पूना हॉस्पिटलवर कारवाईची मागणी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नियमितपणे शुक्रवार पेठ येथील महेश पाठक (वय ५३) हे पूना हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. मात्र, त्यांचे २५ रोजी रात्री दीड वाजता निधन झाले. त्यामुळे त्यांचे नातेवाईक नीलेश महाजन यांनी पूना हॉस्पिटल प्रशासनाला बिलाचे पैसे किती झाल्याचे बिल भरतो, असे सांगितले. तसेच आम्हाला पाठक यांचा मृतदेह द्या, अशी विनंती केली. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाने आता तुम्हाला पूर्ण पैसे भरावे लागतील किंवा तुमच्या पेशंटवर शहरी गरीब योजनेतून उपचार झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता मृतदेह नेता येणार नाही. तुम्हाला सकाळी साडेआठ वाजता यावे लागेल, तेव्हा तुमहाला आधी बिल भरून मगच मृतदेह नेता येईल, असे सांगून तब्बल आठ तासांनंतर पाठक कुटुंबाला ताब्यात मृतदेह देण्यात आला.
मृतदेह नेताना मात्र पूना हॉस्पिटलने तुम्हाला कोणतेही बिल भरावे लागणार नाही. उलट आमच्याकडून तुम्हाला सात हजार रिफंड करण्यात येणार आहेत. तुम्ही आता मृतदेह घेऊन जा. तसेच नंतर येऊन सात हजार रुपयांचा रिफंड घेऊन जा, असे सांगितले, त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाच्या या कराभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


