भोर: यंदा उशिरा झालेल्या परतीच्या पावसाने भोर तालुक्यातील चारही धरणे शंभर टक्के भरली असली, तरी सध्या भाटघर-१७. ११. नीरा-देवघर- २०.९५, गुंजवणी-२७.३२, वीर-४३.२८ टक्के नीच्चांकी पाणीसाठा उपलब्ध असल्याने धरणांनी तळ गाठला आहे. दरम्यान पुढील काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याचे चित्र आहे.
कडक उन्हाळा सुरू झाल्याने जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत तालुक्याच्या बहुतांशी भागात पाण्यासाठी नागरिकांना वणवन भटकावे लागत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार शासनाने काही गावांना टँकर सुरु केले आहेत. परंतु, जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता भेडसावू लागला आहे. उष्णतेने नागरिक हैराण होऊन गेले आहेत. तर, बंधारे, विहिरी, नाले कोरडेठाक पडल्याने उन्हाळी पिके करपून चालली आहेत. भाटघर, नीरा-देवधर, गुंजवणी तसेच बोर धरणांच्या पाणलोट क्षेत्राशेजारील पिकांना पाणी उपलब्ध होत नसल्याने पिके सुकू लागली आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चारही धरणे उशिरा १०० टक्के भरूनही पाणीसाठा घटला असल्याचे चित्र आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असली तरी उंच व खडकाळ भागामुळे पाणी संखोल भागाकडे वाहून जाते. पावसाचे पाणी साठवून राहण्यासाठी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्यात यावेत. तर धोम बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्याला आवर्तन करण्यात यावे, अशी मागणी नारिकांकडून करण्यात येत आहे.


