खोपोली : डोणवत गावातील बनावट शिक्षक चक्क नक्षलवादी निघाल्याने खालापूरमध्ये खळबळ उडाली आहे. पुणे एटीएस युनिटने अत्यंत गोपनीयरीत्या माहिती मिळवून ३ मे रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि ४ मे रोजी अधिकृतपणे अटक केली. सोमवारी त्याला मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास दहशतवादविरोधी पथक करत आहे. या अटकेमुळे नक्षलवादी हालचालींना मोठा धक्का बसला असून आणखी काही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ ‘लॅपटॉप’ डोणवत गावात सुनील जगताप या बनावट नावाने राहत होता. आदिवासी पाड्यांमध्ये मुलांना शिकवण्याचे ढोंग करत आपली खरी ओळख लपवत होता. नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत कांबळे याच्यावर काळाचौकी पोलीस ठाण्यात २०११ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात तो तब्बल १४ गंभीर कलमांखाली आरोपी होता आणि त्याला न्यायालयाने फरार घोषित करत निरंतर अटक वॉरंट केले होते. आरोपी प्रशांत कांबळे ऊर्फ ‘लॅपटॉप’ गेल्या ६ ते ७ वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील डोणवत गावात एका चाळीत तीन वर्ष राहिला. नंतर तो जि. प. शाळेसमोरील इमारतीत राहत होता. कुटुंबासोबत राहत नसल्यामुळे तिन्हीवेळचे जेवण हॉटेल किंवा चायनीजच्या गाडीवर करीत होता. त्याच्याकडे एक स्कुटी होती. रात्रीच्या वेळी कधीही रूमवर येत असल्याने त्याचे वागणे संशयास्पद वाटत होते, अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे. परंतु, तरीही शिक्षकाच्या वेशात आदिवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी तो जात असल्याने ग्रामस्थांना शंका आली नव्हती.


