बारामती: पत्नीच्या अल्पवयीन बहिणीवर (मेहुणी) अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला बारामती येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. सस्ते यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला ३० हजार रुपये दंड केला असून दंडातील निम्मी रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचाही आदेश न्यायालयाने दिला.
संबंधित आरोपीच्या पत्नीची लहान बहिण आई-वडील नसल्याने लहानपणापासूनच बालगृहात राहत होती. शिक्षणाच्या निमित्ताने आरोपी तिला गावी घेऊन आला होता. ५ मे २०१९ रोजी पत्नी घरात नसताना पीडितेला धमकावत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितला, तर जिवे मारीन अशी धमकी दिली. हा प्रकार पीडितीने दुसऱ्या दिवशी आरोपीची आई व तिच्या आजीला सांगितलेला होता.
पीडीतेच्या बहिणीलाही हा प्रकार समजला. त्यामुळे तिचे पतीशी भांडण झाले होते. या भांडणामुळे तिने विषारी औषध प्राशन केले होते, त्यात तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे आरोपी विरोधात शारीरिक अत्याचार प्रकरणी पोक्सोसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक बी.बी. जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. पीडितेने झालेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. पीडितेचा जबाब व वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून न्यायाधीश सस्ते यांनी आरोपीला आजन्म कारावास व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाला सहायक फौजदार ए.जे. कवडे, कोर्ट पैरवी अधिकारी नामदेव नलवडे, हवालदार एम. के. शिवरकर यांचे सहकार्य झाले.


