पिंपरी: देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड महापालिकेने हरित कर्जरोखे (ग्रीन बाँड) ‘इश्यू’ केले. या बाँडला नागरिकांचा व गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, अशा ‘कॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हरित कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग कार्यक्रम बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधील बीएसई आंतरराष्ट्रीय सभागृहात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते, कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, आमदार उमा खापरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग, अप्पर मुख्य सचिव असिम गुप्ता, प्रधान सचिव डॉ. के. गोविंदराज, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक सुंदरम रामामूर्ती उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, कर्ज रोखे इश्यू झाल्यानंतर काही मिनिटांतच १०० कोटी रुपयांची गुंतवणूक याद्वारे करण्यात आली.


