मुंबई: अहान पांडेचा ‘सैयारा’ हा चित्रपट येत्या वीकेंडला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील त्याचा लूक आणि अभिनेत्री अनीत पड्डा सोबतच्या केमिस्ट्रीचे खूप कौतुक होत आहे. पण प्रदर्शनापूर्वीच सेन्सॉर बोर्डाने त्यातील काही दृश्ये आणि शब्द काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याची सेन्सॉर प्रक्रिया पूर्ण झाली असून बोर्डाने काही दृश्ये काढण्याच्या अटीवर चित्रपटाला यू/ए १६+ प्रमाणपत्र दिले आहे. म्हणजेच १६ वर्षांवरील लोक हा चित्रपट पाहू शकतात.
बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटातील काही दृश्ये काढून टाकण्यास सांगितले आहे. याशिवाय चार ठिकाणी बोललेले वादग्रस्त शब्द बदलण्यासही सांगण्यात आले आहे. मात्र, हे शब्द काढून त्याजागी काय बदलायचे, हे मंडळाने यादीत नमूद केलेले नाही. तसेच चित्रपटातील १० सेकंदाचे सेन्सस, इंटिमेट आणि बॉडी एक्सपोजिंग सीन्स काढून टाकण्यास बोर्डाने सांगितले आहे. याशिवाय हिरो-हिरोईनच्या बाईक सीनमध्ये हेल्मेट सुरक्षेसाठी डिस्क्लेमर लावण्यास सांगण्यात आले आहे. हे सर्व बदल केल्यानंतरच चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा काही पहिला चित्रपट नाही, ज्यावर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे. यापूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘सुपरमॅन’ या हॉलिवूड पटाला भारतात प्रदर्शित होताना सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीलाही सामोरे जावे लागले होते. बोर्डाने त्यातील ३३ सेकंदाचा किसिंग सीन काढून टाकला. बोर्डाच्या या निर्णयावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली असून अनेकजण या निर्णयावर नाराज आहेत. या निर्णयानंतर दोन आठवड्यांतच सेन्सॉर बोर्डाने पुन्हा एकदा कात्री लावली आहे.
मोहित सूरीचा ‘सैयारा’ हा एक इमोशनल रोमँटिक म्युझिकल चित्रपट आहे, ज्यातून अहान पांडे डेब्यू करत आहे. याशिवाय ‘बिग गर्ल्स डोंट क्राय’मधून तिच्या अभिनयाची वाहवा मिळवणारी अनित पड्डाही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून लोकांना त्याचा ट्रेलर आवडत आहे. हा चित्रपट २.३६ तासांचा आहे. मोहितच्या दिग्दर्शनाचा जलवा यापूर्वी ‘आशिकी २’, ‘आवारापन’ आणि ‘मलंग’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये दिसले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगसाठी चांगले आकडे समोर आले आहेत.


