पुणे : इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत १ लाख ६६ हजार ७५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यापैकी कॅप पद्धतीतून १ लाख २९ हजार २१७ तर कोटा पद्धतीतून ३७ हजार ५३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.
अकरावीच्या दुसऱ्या फेरीनुसार प्रवेशासाठी २१ जुलैपर्यंत मुदत आहे. दुसऱ्या फेरीत २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांची निवड झाली. विद्यार्थ्यांना १८ जुलै ते २१ जुलै या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहे. आत्तापर्यंत या फेरीत सर्व विभागातून १ लाख ६६ हजार ७५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. तिसऱ्या नियमित फेरीत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १८ जुलै ते २१ जुलै या कालावधीत नवीन महाविद्यालय, नवीन अर्ज नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग १ भरता येणार आहे.
तसेच २२ व २३ जुलै रोजी प्रवेश अर्जाचा भाग २ भरता येईल. २६ ते २८ जुलै या कालावधीत तिसऱ्या फेरीनुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश घेता येईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली. विभागनिहाय प्रवेशानुसार, मुंबई विभागात ३९ हजार ५९४, छत्रपती संभाजीनगर विभागात २८ हजार ५४२, पुणे विभागात २६ हजार ६८०, अमरावती विभागात १४ हजार १३४, कोल्हापूर विभागात १३ हजार ३६१, लातूर विभागात १० हजार १६५, नागपूर विभागात १७ हजार ४४९ आणि नाशिक विभागात १६ हजार ८३० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.


