पुणे : बुधवार पेठेतील देवदासी वस्ती परिसरातील एका वाड्यावर छापा टाकून पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. त्यांनी पश्चिम बंगालचे नागरिक असल्याचा बनाव केल्याची माहिती प्राथमिक पोलीस तपासात पुढे आली आहे. जहानारा मजिद शेख (वय ४५, रा. मुळ जैशोर, खुलना), शिल्पी बेगम रबिउल्ला शेख (वय २८, मुळ, ढाका), नुसरात जहान निपा (वय २८, रा. मुळ नारायाणगंज), आशा खानाम इयर अली (वय ३०, रा. मुळ, नोडाई, कालिया) आणि शिल्पी खालेकमिया अक्तर (वय २८, रा. रायपुरा, बांगलादेश) ही ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
या महिलांनी बांगलादेशातून छुप्या मार्गाने सीमा ओलांडून देशात प्रवेश केला. तसेच, पुण्यात त्या वेश्याव्यवसाय करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.


