शिमला: हिमाचल प्रदेशातील शिलाई गावात दोन भावांनी एकाच युवतीशी लग्न केले. हे तिघेही हट्टी आदिवासी समुदायातील असून, या समाजात बहुपतीची प्रथा आहे. या प्रथेचे पालन करतच अगदी वाजतगाजत पार पडलेल्या या अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
प्रदीप आणि कपिल नेगी अशी नवरदेवांची नावे आहेत. तर नवरीचे नाव सुनीता चौहान आहे. प्रदीप हा सरकारी खात्यात नोकरीला आहे. तर त्याचा धाकटा भाऊ कपिल परदेशात नोकरी करतो. कुन्हाट गावात राहणाऱ्या सुनीता हिने आपण कोणत्याही दबावाविना हे लग्न केल्याचे सांगितले. १२ जुलैला हा विवाहसोहळा सुरू झाला आणि हट्टी समुदायातील प्रथा-परंपरांप्रमाणे तीन दिवस तो चालला. प्रदीपने आपल्या समुदायाच्या प्रथेचे पालन केल्याबद्दल आपल्याला अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवरील हट्टी आदिवासी समुदायाला तीन वर्षांपूर्वी अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला. या समुदायात बहुपतीची प्रथा अनेक शतकांपासून चालत आली आहे.
अलीकडे महिलांमधील वाढती साक्षरता, आदिवासींची आर्थिक प्रगती यांमुळे महिला एकापेक्षा अधिक पुरुषांसोबत लग्न करण्यास नकार देतात. हिमाचल प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री वाय. एस. परमार यांनी या प्रथेवर संशोधन केले आणि लखनौ विद्यापीठातून ‘हिमालयातील बहुपती प्रथेची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी’ या विषयावर आपली पीएच.डी. पूर्ण केली. आदिवासी समुदायातील प्रथा-परंपरांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनुसार वडिलोपार्जित संपत्तीचे वाटे-हिस्से होऊ नये, हे बहुपती प्रथेमागील प्रमुख कारण आहे. या समुदायातील ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही अशा प्रकारची लग्ने गुपचूप होतात आणि त्यांना समाजमान्यतादेखील आहे.


