नवी दिल्ली: भारतीयांना ‘आधार’ नावाने विशिष्ट ओळख क्रमांक जारी करणारे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यूआयडीएआय लवकरच शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून मुलांची बायोमॅट्रिक माहिती अपडेट करणार आहे. दोन महिन्यांनंतर टप्प्याटप्प्याने ही योजना सुरू होईल.
प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. सात कोटींहून अधिक बालकांच्या ‘आधार’ साठीचे बायोमॅट्रिक अपडेट अर्थात बोटांचे ठसे व डोळ्यांचे स्कॅन केलेले नाही. पाच वर्षे वयावरील बालकांची ही बायोमॅट्रिक माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे. त्यामुळे अशा कोट्यवधी बालकांची बायोमॅट्रिक माहिती शाळांच्या माध्यमातून अपडेट करण्याच्या योजनेवर यूआयडीएआय काम करत आहे. सध्या या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू आहे. येत्या ४५ ते ६० दिवसांत आवश्यक यंत्रणा तयार होईल, असे कुमार यांनी सांगितले.


